हा प्रशिक्षण कार्यक्रम विशेषतः युवकांसाठी राबविण्यात येत असून डहाणू तालुक्यातील दोन आदिवासी मुलांच्या वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळत आहे. आदिवासी मुलांचे वसतिगृह (नवीन), वडकून येथील ४० तर आदिवासी मुलांचे वसतिगृह (जुने), आगर येथील ३६ असे एकूण ७६ विद्यार्थी सध्या या प्रशिक्षणाचे धडे घेत आहेत.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सुरुवातीला हलकी वाहतूक वाहने (एलएमव्ही) तसेच जड वाहतूक वाहने व्यावसायिक (एचसीव्ही) परवाने दिले जाणार असून, पुढील टप्प्यात औद्योगिक क्रेन चालक व पोर्ट क्रेन चालकांचे विशेष प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
स्थानिक आदिवासी युवकांना रोजगारक्षम बनवणे, स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे, कुशल मनुष्यबळ निर्मिती करणे तसेच देशाच्या आर्थिक वाढीस आणि व्यावसायिक स्पर्धात्मकतेला चालना देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पालघर जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांमुळे वाहन चालक व तंत्रज्ञांची वाढती मागणी तसेच चारचाकी वाहन दुरुस्ती व देखभाल क्षेत्रात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी लक्षात घेता हे प्रशिक्षण युवकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार असून, जास्तीत जास्त युवकांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय उभा करावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांनी केले आहे.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट यांच्या माध्यमातून राबविण्यात येणारा वाढवण पोर्ट स्किलिंग कार्यक्रम ग्रामीण व आदिवासी भागातील युवकांच्या कौशल्य विकासासाठी सातत्याने प्रभावी ठरत असून, हा उपक्रम स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या दृष्टीने एक सुवर्णसंधी ठरत आहे.

Post a Comment
0 Comments