Type Here to Get Search Results !

पुस्तके वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि बौद्धिक विकासाला चालना -..जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड


    पालघर,


दि. ०२ जानेवारी:  पुस्तक पेटी भेट उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचनाची गोडी वाढून  पुस्तके वाचनामुळे शैक्षणिक आणि बौद्धिक विकासाला  चालना मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी व्यक्त केला.

      नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मराठी वाचनसंस्कृती अधिक समृद्ध करण्याच्या उद्देशाने मनोविकास ग्रंथोत्सव व पालघर साहित्य व कला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच निऑन फाउंडेशनच्या विशेष सहकार्याने “पुस्तक पेटी भेट उपक्रम” जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या हस्ते करण्यात आले.

   या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, तहसीलदार सचिन भालेराव, पालघर साहित्य व कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश लवेकर, सचिव अमोल पाटकर, खजिनदार राहुल ठाकूर, निऑन फाउंडेशनच्या संध्या पाटील, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद पाटील, तसेच विविध शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा रोडखड, दाभोण (पिलेना पाडा), टेम्भीखोडावे, घाटीम, कर्दळ, आर्यन, अभिनव विद्यालय विराथन बुद्रुक तसेच आंभाण–मनोर येथील जिल्हा परिषद व संस्थेच्या शाळांना वाचनीय पुस्तकांच्या पेट्यांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि ज्ञानविश्व अधिक व्यापक व्हावे, या हेतूने ही पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली.

पुस्तक पेट्यांचे वितरण करताना जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. “पुस्तक पेटीतील पुस्तके केवळ कपाटात बंद करून न ठेवता विद्यार्थ्यांना मुक्तपणे वाचनासाठी उपलब्ध करून द्यावीत. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांचा वैचारिक व बौद्धिक विकास निश्चितच घडतो,” असे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments